गोपाळ हरी देशमुख | Gopal Hari Deshmukh
अनुक्रमणिका
जन्म
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला. त्यांचे वडील हरिपंत हे दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. ते मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते.गोपाळ रावांचे घराणे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यात पावस येथे होते. वयाच्या सातव्या वर्षी गोपाळ हरी देशमुख यांचा विवाह झाला.त्यांना 6 मुले होती. त्यापैकी फक्त डॉ. मोरेश्वर यांनी धन्वंतरी म्हणून सेवा केली.
शिक्षण
गोपाळ हरी देशमुख यांचे शिक्षण पुण्याच्या बुधवार पेठेतील मराठी शाळेत झाले. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी या विषयावर एकूण 10 पुस्तके लिहिली आहे त्यांना संस्कृत,फारसी,हिंदी,गुजराती भाषेचे चांगले ज्ञान होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इंग्रजी शिक्षण घेणारे 19 व्या शतकातील पहिले नवशिक्षित गोपाळ हरी होते.त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचाअभ्यास केला. 1844 मध्ये दक्षिणेतील सरदारांच्या एजंटाच्या ऑफिसला दरमहा 77 रुपये पगाराची ट्रान्सलेटर ची नोकरी त्यांना लागली. 1846 मध्ये ते मुन्सिफ ची परीक्षा पास झाले. मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत या साठीची त्यांची तळमळ होती. 1852 साली वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सिफ पदावर त्यांची नेमणूक झाली. इसवी सन 1852 नंतर त्यांनी जज म्हणून मुंबई प्रांतात विविध ठिकाणी (वाई, सातारा, सुरत, अहमदनगर, ठाणे, अहमदाबाद, नाशिक) नोकरी केली. अहमदाबादला ते दहा वर्ष स्मॉल कॉज कोर्ट मध्ये मुख्य न्यायाधीश होते. गुजरात मध्ये प्रार्थना समाजाची शाखा त्यांनी स्थापली. रतलाम संस्थानाचे एक वर्ष ते दिवाण होते. देशमुखांना ब्रिटिशांनी त्यांना जेपी व रावबहादूर या पदव्या दिल्या होत्या. 1874 साली मुंबई विद्यापीठाकडून फेलो पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. 1880 ते 83 या तीन वर्षांच्या काळात मुंबई कायदे कौन्सिलचे सभासद म्हणून सरकारने त्यांना नियुक्त केले.
ग्रंथसंपदा
गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.लोकहितवादी हे हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. 1849 साली पहिले पुस्तक ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. “मातृभाषेतून शिक्षण” या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे. भारतखंड पर्व (1851) , पाणीपत ची लढाई 1877 साली (काशिराज पंडित यांच्या फारसी पुस्तकाचा अनुवाद), हिंदुस्थानाचा इतिहास (1872), गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास यामध्ये सौराष्ट्र देशाचा इतिहास, उदयपुरचा इतिहास, आणि पुष्पयन ही त्यांची साहित्ये आहेत. तसेच पृथ्वीराज चौहानचा इतिहास यामध्ये सुद्धा दोन गोष्टींवर जास्त भर दिला गेला आहे ते म्हणजे जातीभेद आणि भिक्षुक. त्यानी 1878 मध्ये गीतातत्व हा ग्रंथ लिहला.
वैचारिक कार्य
गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रातून 108 शतपत्रे लिहिली. हीच शतपत्रे पुढे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बहिष्कृत भारत या नियकालिकातून प्रसिद्ध केली. 1882 साली ‘लोकहितवादी’ नावाचे 20 पानाचे मासिक त्यांनी सुरू केले. तेच पुढे त्रैमासिक झाले. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश मधे त्यांनी लेखन केले. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरु केली. गोपाळ हरी देशमुखांनीपुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. गुजराती व इंग्लिश भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. ‘गुजराती बुद्धी वर्धक सभा’ त्यांनी स्थापन केली. हिंदुस्थानासाठी इंग्लंड प्रमाणे संसद असावी अशी मागणी त्यांनीच प्रथम मांडली. ‘एक ब्राह्मण’ नावानेही त्यांनी लिखाण केले. शिक्षण घेतल्यावर पुरुषांच्या शेंड्या उपटण्याची महिलांमध्ये क्षमता येईल असे विचार त्यांनी मांडले.
सामाजिक विचार
गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रंथप्रामाण्यास त्यांनी विरोध केला. पोथ्या पुरणांमधील अंधश्रध्देविरुद्ध त्यांनी विचार मांडले. ‘बालविवाहापेक्षा सती बरी’ हा लेख त्यांनी प्रभाकर मध्ये लिहिला. संस्कृत विद्येचा व्यावहारिक उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे होते. विभक्त कुटुंब पद्धती चा आग्रह त्यांनी केला. त्यामुळे उद्योगवृद्धी होण्यास मदत होईल हा विचार मांडला. मद्यपानाचा निषेध केला. थिओसोफिकॅल सोसायटी ऑफ बॉम्बे चे ते अध्यक्ष होते. गुजरात मध्ये ‘गुजराती वक्तृत्व सभा’ तसेच ‘गुजराती पुनर्विवाह मंडळ’ त्यांनी स्थापन केली.
धार्मिक विचार
देशमुख यांचा धार्मिक सुधारणांचा दृष्टिकोन तर्कशुद्ध आणि मानवतावादी दृष्टीकोनातून वैशिष्ट्यीकृत होता. त्यांनी हानिकारक हिंदू धार्मिक रूढीवादाला आव्हान दिले आणि स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण पुरोहितांच्या धार्मिक बाबींमधील मक्तेदारीवर हल्ला केला. मूर्तीपूजेला त्यांचा विरोध होता. ब्राम्हणास दक्षिणा देण्यास विरोध केला.
त्यांनी त्यांचे नीतिप्रधान धर्माचा पुरस्कार करणारे तीन तत्व जगांसमोर मांडले.
- सर्वांनी ईश्वराचे भजन अंत:करणापासून करावे
- मुंज, लग्न व प्रेतक्रिया सोडून बाकी संस्कार रद्द करावे .
- जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा जीव मानावा.
आर्थिक विचार
गोपाळ हरी देशमुख हे मराठीतून लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ञ होते. मंदिरे बांधणे, तीर्थयात्रा करण्यापेक्षा कारखाने काढून संपत्ती वाढवा असा सल्ला त्यांनी दिला. ‘लक्ष्मी विलायतेस चालली/दर्यापार जाऊ लागली’ हा त्यांचा लेख प्रसिध्द आहे. लक्ष्मीज्ञान ग्रंथातून ऍडम स्मिथ यांचे अर्थशास्त्र त्यांनी लोकांसमोर आणले.
मूल्यमापन
त्यांच्या आचार विचारात विसंगती होती. ते रोज देवदर्शन फुले वाहने नैवेद्य करायचे. समुद्र पर्यटन त्यांनी टाळले होते. ते आर्य समाजाचा पुरस्कार करत असत. काही काळ मुंबईतील आर्य समाजाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. 1869 मध्ये विधवा स्त्रीच्या पुनर्विवाह त्यांनी अनुमोदन देणे टाळले. ही त्यांच्या जीवनातील मोठी विसंगती होती.
निधन
9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचे निधन झाले. निर्मल कुमार फडकुले म्हणतात लोकहितवादी हे ‘महाराष्ट्राचे राजा राममोहन रॉय’ होते. देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या योगदानाचा विविध प्रकारे गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्या अग्रेषित-विचार दृष्टीकोनासाठी आणि सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवरील खोल अंतर्दृष्टीसाठी त्यांचा आदर केला जातो.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel