महात्मा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
जन्म
महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबाच्या यात्रेदिवशी जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांचे कुटुंब पेशव्यांच्या दरबारात काम करत होते, विशेषत: त्यांच्या वडिलांनी दरबार सजवण्याचे काम केले होते, त्यासाठी त्यांना पेशव्यांनी 35 एकर जमीन दिली होती. त्यांच्या फुलविक्रीच्या व्यवसायामुळे गोरा (उच्च जातीचे लोक) त्यांना ‘गोरन्याला फुले’ म्हणू लागले. ज्योतिरावांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन जबरदस्तीने बळकावली. परिणामी, ज्योतिरावांचे वडील गोविंदराव उदरनिर्वाहासाठी भाजीपाला शेती करू लागले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे त्यांचे वडिलोपार्जित गाव होते. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.
शिक्षण
महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील पंतोजी शाळेत मराठी माध्यमात झाले. त्यानंतर काही काळ भाजीविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर, 1842 मध्ये, वयाच्या 14 व्या वर्षी, त्यांनी इंग्रजी माध्यमात माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांची बुद्धी तीक्ष्ण होती, त्यामुळे त्यांनी पाच-सहा वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती आणि इतर भाषांमध्ये पारंगत होते. तिथे त्यांना गफारबेग मुंशी & मि. लिजिट हे शिक्षक म्हणून लाभले.
शिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, उस्मान शेख, सखाराम परांजपे, वासुदेव नवरंगे हे त्यांचे बालपणीचे मित्र होते.खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी वयाच्या 12 व्या वर्षी विवाह झाला. ‘थॉमस पेन’ यांनी लिहिलेल्या ‘द राईट ऑफ मॅन’ या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
प्रारंभीक जीवन / जडणघडण
फुले यांनी 1847 साली लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले. अहमदनगर मिशनरी स्कूल आणि प्रा मिस फरार कडून प्रेरणा घेऊन, 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही भारतातील पहिली मुलींची शाळा समजली जाते. पहिल्या दिवशी शाळेत आठ मुली उपस्थित होत्या. महात्मा फुले यांनी सावित्रीबाई यांना साक्षर करून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवले. शूद्रांच्या (खालच्या जातीतील लोक) शिकवण्याच्या कामाला विरोध झाल्यामुळे,1849 गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. फुले यांना त्यांच्या पत्नींसह घर सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे उस्मानशेख यांनी राहण्यास जागा दिली. दरम्यान पहिली शाळा बंद करावी लागली. ३ जुलै १८५१ रोजी मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीने अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बंद पडलेली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी नाना पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. त्याच साली त्यांनी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा उभारली. 1852 साली वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा चालू केली यासाठी सौ. ई सी जोन्स यांची त्यांना खूप मदत झाली. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.
1856 साली नामदेव कुंभार व सज्जन रोडे या मारेकऱ्यांनी जोतिबांना मारण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर दोघेही फुलेंचे अनुयायी झाले. २८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला.1963 साली त्यांनी हा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव यशवंत ठेवले. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे 1865 साली न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.1868 घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा त्यांनी प्रसिद्ध केला व रायगड येथील समाधीचा जिर्णोद्धार केला.
सत्यशोधक समाज
24 सप्टेंबर1873 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच वर्षी त्यांचे “गुलामगिरी” हे पुस्तकही प्रकाशित झाले.दोन्ही घटनांनी पश्चिम आणि दक्षिण भारताच्या भविष्यातील इतिहास आणि विचारसरणीवर खूप प्रभाव टाकला.सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष स्वत: महात्मा फुले होते. नारायण कडलक हे कार्यवाहक होते. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सर्व साक्ष जगत्पती | त्यासी नकोस मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे.
1877 साली समाजाच्या प्रसारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू साप्ताहिक सुरू केले.या समाजातर्फे अंबालहरी हे वृत्तपत्र चालवले.व्यंकु काळेवार यांनी वृत्तपत्र छापण्यासाठी 1200 रुपये खर्च करून छापखाना विकत घेवून दिला. सत्यशोधक समाजाची बैठक दर रविवारी होत असे. 1875 मधे जुन्नर व नगर भागात खतफोडीचे बंड पुकारले. न्या रानडे यांच्या मदतीने 1875 साली दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. 1876 मधे फुलेंनी कृष्णराव भालेकर आणि हरी शिंदे यांच्या सोबत कमर्शिअल अँड काँट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना. यातूनच त्यांनी ठेकेदारीचा व्यवसाय केला. 1876 ते 1882 साल पर्यंत त्यांनी पुणे नगरपालिकेत सदस्यपद भूषविले. 1879 मधे डेक्कन अग्रिकल्चर कायदा पास केला. 1882 साली त्यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली. 1885 मधे सत्सार आणि इशारा हे ग्रंथ लिहिले. 1888 राणी व्हिक्टोरिया चा मुलगा ड्युक ऑफ कॅनॉट याच्या सभेला शेतकऱ्याच्या वेशात हजर. 1888 मुंबई मध्ये महात्मा रावबहादूर वडेकर यांच्या वतीने त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. त्यामुळे जोतीराव फुले हे “महात्मा फुले” या नावाने ओळखले जाऊ लागले.
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
फुले यांनी लिहलेले ग्रंथ
जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली तृतीयरत्न हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात. 1869 साली त्यांनी ब्राम्हणांचे कसब हे पुस्तक लिहले. गुलामगिरी हे त्यांचे पुस्तक 1873 साली प्रकाशित करण्यात आले. गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केले.1883 साली त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. इशारा , सत्सार अंक 1 आणि सत्सार अंक 2 हे पुस्तक 1885 साली लिहले. महात्मा फुले यांनी 1891 साली लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.. ‘सत्यमेव जयते’ हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली.
निधन
२८नोव्हेंबर 1890 साली पुणे येथे त्यांचे निधन झाले.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel