बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
जन्म
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले या गावी झाला. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी दशेतच 15 रुपये पगारावर गणिताचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. 1832 मध्ये अक्कलकोटच्या महाराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले .तिथेच ते कानडी भाषा शिकले.तिथे दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी लाड असे विद्यार्थी त्यांना लाभले. तसेच विश्वनाथ नारायण मंडलिक हे त्यांचे शिष्य होते. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली. लंडनच्या जॉग्रफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे सदस्यपद बाळशास्त्री यांच्याकडे होते.
सामाजिक कार्य
सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून ‘बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली.उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी प्रसार केला.विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते तसेच विधवांच्या पुनर्विवाहाचेही ते पुरस्कर्ते होते.
शैक्षणिक कार्य
1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांची नियुक्ती झाली. पुढे मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली. मुंबई प्रांतातील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते पहिले मराठी भाषिक प्राध्यापक होते. तेथे ते गणित भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे विषय शिकवत. जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. म्हणूनच त्यांना पहिले इतिहास संशोधक म्हणून ओळखले जाते. इंग्रजी शिक्षणाचे ते समर्थक होते.
वाङमयीन क्षेत्रातील कार्य
1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘इंग्लंड देशाची बखर’ हा ग्रंथ लिहला. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली. बाळशास्त्री वांग्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते गणित व ज्योतिष शास्त्र या विषयातही त्यांचा अधिकार मोठा होता.1836 मध्ये त्यांनी बाल व्याकरण हा ग्रंथ लिहला. ‘सारसंग्रह’ हा ग्रंथ 1837 मध्ये प्रकाशित करण्यात आला. 1838 साली ‘नीतिकथा’ हे साहित्य प्रकाशित करण्यात आले. ‘हिंदुस्थानचा इतिहास’ ‘भूगोल विद्येचे मूलतत्त्वे’, ‘शून्यलब्धी’ (गणित) ‘संध्येचे भाषांतर’ या ग्रंथांचा 1846 साली समावेश करण्यात आला आहे.
मराठी वृत्तपत्राचे जनक
सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. यासाठी त्यांनी रघुनाथ हरिश्चंद्रजी व जनार्दन वासुदेव यांची मदत घेतली. दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रसिद्ध करण्यात येत असे. ते 8 पानाचे वृत्तपत्र होते.या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक इंग्रजीत असे.दर्पण हे सुरुवातीला पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक होते. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. 24 ऑगस्ट 1832 रोजी जांभेकरांनी ‘विद्या हे बळ आहे’ या शीर्षकाचा लेख लिहिला व त्यातून विद्येचे महत्त्व मानले. 1840 साली ‘दिग्दर्शन’ हे मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू केले. ‘दर्पण’ अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै १८४०मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.’दिग्दर्शन’मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास याविषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत.1845 मधे पहिली छापील ज्ञानेश्वरी जांभेकरांनी काढली.
श्रीपती शेषाद्री प्रकरण
बाळशास्त्री जांभेकर यांनी हिंदू धर्मातून इतर धर्मात भरकटलेल्या लोकांच्या पुनरुत्थान आणि शुद्धीकरणावर दृढ विश्वास ठेवला आणि त्यांच्या पूर्वजांच्या धर्मात परत जाण्याचा सल्ला दिला. आदरणीय शेषाद्री ब्राह्मणाचे दोन पुत्र नारायण आणि श्रीपती शेषाद्री यांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या हस्तक्षेपातून ही खात्री पटली. नारायण यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असताना, श्रीपती अशाच धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभे होते. जांभेकरांनी अतूट दृढनिश्चयाने, या धर्मांतराचा प्रतिकार करण्यासाठी श्रीपतींना मदत केली, ज्यांना पक्षीशास्त्रीय राखीव, त्र्यंबकशास्त्री शालिग्राम, जगन्नाथ शंकरशेठ आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यासह मित्रपक्षांच्या युतीने पाठिंबा दिला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे, त्यांनी श्रीपतींना मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान केले, त्यांच्या हिंदू धर्मातील स्थिरता सुनिश्चित केली, ज्यामुळे जांभेकरांची धार्मिक पुनरुत्थान आणि एकतेची दृष्टी कायम राहिली.
ओळख
मराठी वृत्तपत्राचे जनक, महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक व विचारवंत म्हणुन बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख होती. न्यायमूर्ती चंदावरकर जांभेकरांना पश्चिम भारतातील आद्यऋषी म्हणत. अर्वाचीन मुकुटमणी प्रख्यात पंडित अशा शब्दात दादाभाई नौरोजी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला. ‘बाल बृहस्पती’ म्हणून त्यांची ओळख होती. इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन गौरविले होते.
मृत्यू
17 मे 1846 रोजी मुंबई येथे अल्पावधीच्या आजारानंतर जांभेकरांचा मृत्यू झाला. केशवराव भवाळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel